कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लांबणीवर पडलेली महानगरपालिकेची निवडणूक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
देशात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. पण हळूहळू अनलॉक सुरू झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणुका घेताना कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी काही नियम अटी घातल्या आहेत. तसेच मतदानप्रसंगी प्रत्येक मतदाराला हातमोजे वापरण्यात येणार आहे. कोरोना काळात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदार संघ, नगरपरिषद, महानगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका होण्याचा मार्ग खुला झाला आहे. राज्यातील औरंगाबाद, नागपूर, पुणे पदवीधर मतदारसंघ, व पुणे आणि अमरावती शिक्षक मतदार संघाची मुदत संपली आहे. तसेच राज्यातील अनेक नगर परिषदा, महानगरपालिकांची मुदत संपलेली आहे. राज्य सरकारने निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी तयारी दर्शविलेली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्याबाबत पत्र पाठविले आहे. औरंगाबाद मनपा निवडणुकीची आरक्षण सोडत, वॉर्ड रचना यापूर्वीच जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला फक्त निवडणुकीची तारीख जाहीर करावयाची आहे. डिसेंबर अखेरपर्यंत निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.